जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच यवतमाळ जिल्हा एक नव्हे तर चार खुनाने हादरला आहे. प्रत्येक परिवारातील पती व पत्नीचे नाते महत्वाचे मानले जात पण याच नात्यात दुरावा निर्माण झाला कि कधी काय होईल हे कुणालाही सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा याठिकाणी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील चार जणांचा कुटुंबातील सदस्यानेच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाेलिसांनी या प्रकरणी गोविंद विरचंद पवार यास अटक केली आहे. ही घटना पारधी बेड्यावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.
पत्नीच्या चारित्र्यावरून हत्याकांडाचा थरार घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी घटनेची पाहणी केली. या घटनेत गाेविंद पवार याचा सासरा पंडित भाेसले, मेहूणा ज्ञानेश्वर भोसले आणि सुनील भोसले, पत्नी रेखा यांचा मृत्यू झाला आहे. पवार याची सासू रुखमा या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आले आहे. कळंब पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंड यांनी घटनास्थळी जाऊन गाेविंद पवार यास अटक केली.