
जळगाव मिरर | ९ मे २०२६
नांदगावकडून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर कार नियंत्रण सुटून थेट डिव्हायडरवर आदळल्याची घटना गुरुवारी (दि. ८ मे) पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास हिरापूर रोडवरील शिंदे कॉर्नरसमोर घडली. या अपघातात कारमधील बाप-लेक किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून प्रवास करणारे बाप-लेक नांदगावकडून चाळीसगावकडे येत होते. पहाटेच्या वेळी वाहन चालक असलेल्या मुलाला अचानक डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर जाऊन जोरात आदळली. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
या अपघातात चालक मुलगा आणि त्याचे वडील किरकोळ जखमी झाले. दोघांनाही प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, हिरापूर रोडवरील शिंदे कॉर्नर परिसरात गतिरोधक नसल्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे. यापूर्वीही नागरिकांनी प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडे या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अपघातांची मालिका थांबविण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिरापूर रोडवरील शिंदे कॉर्नर येथे तातडीने गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.





















