जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२४
आगामी विधासभा निवडणुकी येत्या काही दिवसांवर येवून ठेपली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली आहे. जुन्नरच्या लेण्याद्रीहून या यात्रेचा शुभारंभ आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाची यात्रा पार पडेल.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेन च्या सहाय्याने पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे तसेच मेहबूब शेख थोडक्यात बचावले. यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, काल अजित पवार यांच्या यात्रेत संपूर्ण गुलाबी फिव्हर पाहायला मिळाला होता. इतकेच काय तर यात्रेसाठी वापरण्यात आलेल्या बसचा रंगही गुलाबी होता. त्यावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यात्रा सुरू होण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना टोला लगावला आहे. आम्ही यात्रा ही सामान्य आहे. आम्हाला कोणत्या विशिष्ट रंगाची गरज नाही असे ते म्हणाले.