जळगाव मिरर ब्युरो
शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून मूळजी जेठा महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेली कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिका योजना व आर्थिक दुर्बल घटक योजना या योजना महाविद्यालयाने बंद केलेले आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त व आर्थिक दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक भवितव्यावर गंभीर असा परिणाम होत असून हे घटक शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर फेकले जात आहेत.
कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मुलांना महाविद्यालयाच्या वस्तीगृहामध्ये मोफत राहण्याची व्यवस्था शैक्षणिक वर्ष २०१९-२० पर्यंत महाविद्यालयामध्ये होत होती. परंतु, आता सामाजिक न्यायाच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वरील मुद्दे अत्यंत संवेदनशील असून महाविद्यालयीन प्रशासनाने या मुद्द्यांचा विचार करून लवकरात लवकर या योजना पूर्ववत कराव्या, या आशयाचे निवेदन सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने मु जे महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन भारंबे यांना देण्यात आले.
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे, महिला रुम असावीत, महाविद्यालयाने केलेली शुल्क वाढ मागे घ्यावी व वरील मागण्यांचा महाविद्यालयाने गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर या योजना सुरु करण्यात याव्या या मागण्या यावेळी करण्यात आल्या. एक आठवड्यात या योजनांसंदर्भात विचार करून त्यावर अंमलबजावणी न झाल्यास सत्यशोधक विदयार्थी संघटनेतर्फे सोमवार दिनांक २९ ऑगस्ट पासून तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाअसून यानंतर होणाऱ्या परिस्थितीला महाविद्यालयीन प्रशासन व प्राचार्य स्वतः जबाबदार राहतील असे सांगण्यात आले.