जळगाव मिरर / २९ मार्च २०२३ ।
पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली. एका धार्मिक स्थळाजवळून काही जण जात असताना अचानक दगडफेक झाली. त्यात पोलिसासह तीन जण जखमी झाले. हल्लेखोरांनी तीन वाहनांचे तसेच काही दुकानांची तोडफोड केली. घटनेनंतर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.
या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर काही जणांनी पाळधी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण पोलिसांकडून हाताळले जात असतानाच, गावात दोन गटात तुफान दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी पोलिसांचे वाहन तसेच पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे यांच्या वाहनाचीदेखील तोडफोड केली. या घटनेची माहिती जळगाव पोलिसांना मिळाल्यानंतर जळगाव, धरणगाव व चोपडा येथून पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला.
रस्त्यावर पडला दगड, विटांचा खच !
दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाली. ही बातमी पसरताच काही जणांनी पाळधीकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी वाहनाची तपासणी करीत अनेकांना माघारी परतावून लावले. घटनेची माहिती मिळाल्या- नंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलिसांनी ज्या भागात दगडफेक झाली, त्या भागातील संशयितांची धरपकड केली. गावातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.