जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२६
जळगाव शहरालगत असलेल्या गिरणा नदी पात्रातून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत मध्यरात्री धडक कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ६ रोजी रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास जळगावहून भुसावळकडे अवैध वाळू वाहतूक करणारे चार डंपर व १ मुरूम वाहतूक करणारे डंपर नशिराबाद टोल नाका येथे प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह पथकाने ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान प्रत्येक डंपरमध्ये प्रत्येकी दोन ब्रास वाळू आढळून आली. संबंधित चारही डंपरचा पंचनामा करून वाहने जप्त करण्यात आली असून ती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारत जवळ लावण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या या कठोर भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.





















