
जळगाव मिरर | १८ मे २०२६
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, सोमवारी (दि. १८ मे) होणाऱ्या निवड प्रक्रियेत नवीन सभापती कोण होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तत्कालीन सभापती सुनील महाजन यांच्याविरोधात तब्बल १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सभापतीपदाच्या निवडीपूर्वी शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपच्या १० संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा पूर्ण झाली असली तरी सभापतीपदासाठी अंतिम नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
सभापतीपदासाठी अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली असली तरी सध्या मुख्य स्पर्धा लक्ष्मण पाटील आणि मनोज चौधरी यांच्यात असल्याचे बोलले जात आहे. या दोघांपैकी एकाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, भाजपकडून ऐनवेळी राजकीय ‘धक्कातंत्र’ वापरून तिसऱ्याच संचालकाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ घातली जाणार का, याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सोमवारी सकाळी निवड प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच पक्षश्रेष्ठींकडून अधिकृत नाव जाहीर होण्याची शक्यता असून, बाजार समितीच्या राजकारणात कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





















