जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२४
पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबांचे दर्शन घेऊन आलेल्या ५ अल्पवयीन मुलांना धरणात असलेल्या पाण्यात पोहोण्याचा मोह झाला. त्यानंतर हे पाच बालक पोहोण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झला. तर दोघे पाण्यातून बाहेर आल्याने ते बचावले. ही घटना ३ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोघे सख्खे भाऊ तर एक त्यांचा मालेगाव येथील आतेभाऊ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहणारे मोहम्मद एजाजनी मोहम्मद मोमीन (वय १२), मोहम्मद हसन लियाज मोहम्मद मोमीन (वय १६), आश्रम पीर मोहम्मद (वय ९), इब्राहिम शेख अमीर (वय १४) व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील आवेश रजा मोहम्मद जैनोद्दीन (वय १७) हे पाचही बालक ३ रोजी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान घरातून पारोळ्यापासून ४ किमी अंतरावरील भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याज मोहम्मद न्याज (वय १६), इमाम रजा न्याज मोहम्मद न्याज (वय १४) तर आवेश रजा शहा मोहम्मद जैनोद्दीन (वय १७) हे तिघे धरणातील पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. तर अन्य दोघे बालक धरणाच्या कमी पाण्यात पोहायला उतरले.
विशेष म्हणजे या पाचही बालकांना पोहोता येत नव्हते. परंतु, केवळ किनाऱ्यावर खेळण्यासाठी उतरलेल्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे एकापाठोपाठ एक पाण्यात घसरून हसन रजा न्याज मोहम्मद न्याज, इमाम रजा न्याज मोहम्मद न्याज व आवेश रजा शहा मोहम्मद जैनोद्दीन हे बुडाले. तर दोघे कमी पाण्यात उभे असलेले आश्रम पीर मोहम्मद, इब्राहिम शेख अमीर यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते त्यांना वाचवू शकले नाहीत. त्यानंतर या दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली व घडलेल्या घटनेची आपबीती सांगितली. यानंतर तेथील नागरिक व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यातील मृत बालकांना पारोळा कुटीर रुग्णालयात आणल्यानंतर डॉ. प्रशांत रनाडे, डॉ. सुनील पारोचे, डॉ. गिरीश जोशी, मंगला त्रिवेणी, दीपक पाटील, प्रमोद सूर्यवंशी, प्रेम वानखडे यांनी शवविच्छेदन केले.
बडा मोहल्यातील तिघा बालकांचा भोकरबारी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर कुटीर रुग्णालयात त्यांचे नातेवाईक व मोहल्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे पारोळा शहरासह संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी खा. ए. टी. पाटील, भाजपचे क्षेत्र प्रमुख गोविंद शिरोळे, राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) डॉ. संभाजीराजे पाटील, माजी जि.प. सदस्य रोहन पवार, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदनवाडकर, पो.नि. विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक अमरदीप वसावे, बी. पी. गीते, तलाठी निशिकांत पाटील, प्रशांत निकम, पोलीस सुनील हटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर बचाव कार्यात पंकज पाटील, प्रवीण पाटील, गौतम जावळे, करण लोहार, रवी कंडारे, विजय महाजन, अंकित राजपूत यांनी सहकार्य केले.