जळगाव मिरर | १५ जून २०२४
देशातील उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावर शनिवारी १५ जून रोजी सकाळी ११ वाजता एक टेम्पो ट्रॅव्हलरचा ताबा सुटून अलकनंदा नदीत पडला. या अपघातात 12 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 14 जण जखमी झाले आहेत. 7 गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून ऋषिकेश एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
ट्रॅव्हलरमध्ये 26 प्रवासी होते. सर्वजण बद्रीनाथ दर्शनासाठी जात होते. हे पर्यटक नोएडा आणि दिल्लीचे आहेत. अपघातामागील कारण हे चालकाला झोप लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
ज्या ठिकाणी अपघात झाला तो ऑल वेदर हायवे आहे. गाडी बाऊंड्री तोडून दरीत 660 फूट पेक्षा जास्त खाली पडला. नदीच्या काठावर असल्याने अलकनंदाच्या जोरदार प्रवाहात प्रवासी वाहून गेले नाहीत. घटनास्थळाजवळ रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. लोकांना वाचवण्यासाठी 3 मजुरांनी नदीत उड्या घेतल्या. यापैकी 2 जण बचावले, परंतु एकाचा मृत्यू झाला. ही ट्रॅव्हलर गाडी हरियाणा क्रमांकाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्या पर्यटकांनी बुक केले होते. शुक्रवारी संध्याकाळी ते दिल्लीहून निघाले. चालक रात्रभर गाडी चालवत राहिला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.