जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२४
राज्यात सध्या नवरात्रीचे दिवस असून सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक गंभीर जखमी असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीमध्ये दरवर्षी यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवीचे दर्शन घेवून याठिकाणी भंडारा देणारे धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब यांच्यावर काळाने घाला घातला. दरवर्षी प्रमाणे मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्या सोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी निघाले होते. मात्र मनुदेवी मंदिर काही किलोमीटर अंतरावर असतानाच त्यांच्या कारचा अपघात झाला.
या भीषण अपघातात वाणी बंधूसह जितेंद्र भोकरे हे तिघे जागीच मृत्युमुखी पडले तर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.