जळगाव मिरर | १९ जुलै २०२४
चंद्रपूर शहरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यात बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला आहे. विशेष म्हणजे मोहाडी नलेश्वर गावातील एकाच घरात 3 बिबटे शिरले आणि त्यांनी सहा जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी नलेश्वर गावात शिरकाव झाल्यावर एकाच घरात हे तीन बिबटे शिरले आहेत. राजेश्वर दांडेकर यांच्या घरात शिरून या बिबट्यांनी सहा जणांना जखमी केले आहे. गावात सध्या रेस्क्यू टीम पोहोचली आहे. या बिबट्या एका घरात शिरल्यानंतर ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे लोक अक्षरशः घराच्या छतांवर जाऊन उभे राहिले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
तसेच बिबट्यांच्या हा हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये 35 वर्षीय विजय देवगिरकर, 50 वर्षीय मनोहर दांडेकर , 30 वर्षीय जितेंद्र दांडेकर, 25 वर्षीय सुभाष दांडेकर, 18 वर्षीय रितिक वाघमारे व 32 वर्षीय पांडुरंग नन्नावारे यांचा समावेश आहे. सध्या रेस्क्यू पथक बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. तीन पैकी एक बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे तर इतर बिबट्यांचा शोध सुरू आहे.