जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटी मागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वास्तविक पाकिस्तानी कलाकार फवाद खान या अभिनेत्याचा नवा सिनेमा भारतात प्रदर्शीत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या सिनेमाला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर देखील राज यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. मनसेने आपल्या काही उमेदवारांची नावे जाहीर करायला देखील सुरुवात केली आहे. विधानसभेला 200 पेक्षा जास्त जागा लागणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आधीच केली आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीनंतर मनसे महायुतीचा एक भाग होईल आणि राज्यातील निवडणुका लढवेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करत आपल्या काही उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील 3 ऑगस्ट रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. तेव्हा या दोन नेत्यांमध्ये बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, पोलिस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता या विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती देण्यात आली होती. याचबरोबर राज्यातील विविध प्रश्ना संदर्भात देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.