जळगाव मिरर / २३ एप्रिल २०२३ ।
राज्याच्या राजकारणात जळगाव जिल्हा आजच्या घडीला केद्रबिंदूस्थानी आहे. त्याचे कारण देखील तसेच काही आहे. जिल्ह्यात दोन दिवसापासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत तळ ठोकून आहेत. तर आज उद्धव ठाकरेंची पाचोरा येथे जाहीरसभा पार पडत आहे. मात्र सभेपूर्वीच राजकारण तापले असून गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिंदे गटाने सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
खेड, मालेगाव याठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा झाल्या आहेत. या सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. मात्र शिंदे गट शिवसेनेचा मंत्री असलेल्या मतदारसंघात ही सभा पार पडत असल्याचे याठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे अशी थेट लढत होणार आहे.
आज 23 एप्रिलला जळगावात उद्धव ठाकरे येत आहेत. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संजय राऊत हे शुक्रवारी रात्रीच जळगावात दाखल झाले आहेत. पुतळ्याच्या अनावरणानंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेपूर्वीच वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल, असा इशारा शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यावर ठाकरे गटाने सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचे बक्षिस घेऊन जा, असे चॅलेंज दिले आहे. त्यामुळे आज सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.