जळगाव मिरर | १ सप्टेबर २०२३
राज्यातील पनवेलमध्ये गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह अखेर गुरूवारी ३१ ऑगस्ट रायगडमधील एका खाडीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या तरुणीचे प्रियांका तांडेल (वय २० वर्ष) असं नाव असून मच्छिमारांना प्रियांकाचा मृतदेह खाडीत दिसल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, प्रियांकाच्या मृत्युची चौकशी करत असताना पोलिस तपासात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. आई-बाबा मोबाईल वापरण्यावरून ओरडतात म्हणून प्रियांका घर सोडून गेली होती. त्यानंतर तिने रागाच्या भरात समुद्रात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली, असं तपासात समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील कासारभाट गावात राहणारी प्रियांका २३ ऑगस्टला घरातून अचानक निघून गेली होती. संध्याकाळपर्यंत मुलगी घरी परतली नसल्याने घरातल्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशन गाठले आणि आपली मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी प्रियांकाचा शोध सुरू केला. दरम्यान, ७ दिवसांनी बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह अरबी समुद्राला लागून असलेल्या पाताळगंगा नदीच्या खोल पत्रात सापडला. रात्रीच्या वेळी मच्छिमारी करताना एका मच्छिमाराला एका अज्ञात युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. मच्छिमारांनी तातडीने या घटनेची माहिती जवळच्या पेण तालुका अंतर्गत दादर सागरी पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी प्रियांकाचा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती.