जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२५
सुसंस्कार आणि नैतिक मूल्यांचा पाया जपणारी मूल्ये श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथात आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा ग्रंथ केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा मार्गदर्शक ग्रंथ आहे, असे प्रतिपादन गीतादास हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी केले.
मोक्षदा एकादशी व गीता जयंतीचे औचित्य साधून जामनेर रोडलगत असलेल्या दूर्गा कॉलनीत श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचे पारायण करण्यात आले. यात सुभद्रा सपकाळे, मोहिनी वायकोळे, किर्ती सपकाळे, सीमा सैंदाणे, अनिता चौधरी, उषा तळेले, सुमनबाई परखड, मीना धांडे, माळीबाई, राजपूत मावशी, विमलबाई पाटील, भक्ती पाटील, श्रद्धा पाटील, प्रेमचंद फेगडे, मथुरा सोनवणे, उत्तम सोनवणे, डॉ. जगदीश पाटील यांच्यासह पुरूष व महिला भाविक सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना गीतादास हभप चंद्रकांत महाराज म्हणाले की, गीता जयंती हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी उत्सव आहे. हा दिवस भगवद्गीता या ग्रंथाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गीता जयंती मार्गशीर्ष शुक्ल एकादशी या दिवशी येते. कुरूक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला उपदेश म्हणजेच भगवद्गीता होय. हा दिव्य उपदेश या दिवशी झाला, म्हणून हा दिवस गीता अवतरण दिन मानून साजरा केला जातो. गीता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलाधार मानला जातो. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे सुंदर समन्वय या ग्रंथात आहे. भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवण्यासाठी हा उत्सव पाळला जातो.
गीता जीवनातील संघर्ष, समस्या, अनिश्चितता, भय, निराशा आणि निर्णय यांवर योग्य मार्ग दाखवते. अर्जुनाच्या संभ्रमातून संपूर्ण मानवजातीच्या संभ्रमाचे उत्तर गीता देते, असे गीतेचे महत्त्वही त्यांनी सांगितले. प्रारंभी परिसरातील महिलांनी श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र म्हटले. त्यानंतर गीतेच्या अठरा अध्यायांचे पारायण करण्यात आले.





















