जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२३
गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदलत असून कधी थंडीचा तडाखा तर कधी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहेत. दिल्लीत मागील दोन दिवसांत कडाक्याची थंडी पडल्याने नागरिकांना हुडहुडी जाणवत होती. आता मात्र, ढगाळ वातावरण तयार झालं असून पुढील दोन दिवसांत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रभावामुळे पुन्हा एकदा देशातील बहुतांश राज्यांमधील हवामानात बदल होणार आहे. काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. येत्या ४८ तासांत दिल्लीसह, एनसीआरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD अंदाजानुसार, २३ डिसेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो. तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये 22 ते 24 डिसेंबर दरम्यान मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे पश्चिम राजस्थान, उत्तर पंजाब आणि उत्तर हरियाणामध्ये 22 ते 23 डिसेंबर दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 ते 24 डिसेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडच्या वरच्या भागात 23 आणि 24 डिसेंबर रोजी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. दिल्लीत शुक्रवारी पाऊस पडल्यानंतर शनिवारपासून तापमानात वाढ होऊ शकते. 23 डिसेंबर रोजी किमान तापमान 9 अंशांपर्यंत तर कमाल तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते.