जळगाव मिरर | ८ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक शहरातून गुन्हेगारी घटना नेहमीच समोर येत असतांना एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. एका चहा टपरीवरील उधारीच्या वादातून तीन जणांनी मिळून आपल्याच मित्राची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून यात मनिष भालधारे (वय २६) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर उर्फ मनीष भालाधरे याच्यावर आरोपी संतोष मानकर यांचे काही पैसे उधारी होते. जेव्हा संतोष मानकर त्याला पैसे मागायचा, तेव्हा मनीष हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. याशिवाय तो संतोषला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत होता. दरम्यान, शनिवारी (६ जानेवारी) रात्री संतोष आणि मनीषमध्ये पुन्हा उधारीच्या पैशांवरुन वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला, की रागाच्या भरात आरोपी संतोष याने आपल्या मित्रांसोबत मनीषवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मनीषचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संतोष मानकर, लोकेश मानकर, पवन मानकर, मोहित शेंडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हत्येमध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
आरोपी संतोष मानकर यांचे कुडवा येथे चहा नाश्त्याचे दुकान आहे. दरम्यान, मनीषच्या हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर आरोपींच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली. रामनगर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तीन आरोपींना अटक केली.