जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२४
पारोळा तालुक्यातील करमाड येथील सैन्य दलात सेवा बजावत असलेल्या ४० वर्षीय जवानाचे कॅम्पमध्ये सेवा बजावत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, २९ रोजी करमाड येथून शासकीय इतमामात त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील करमाड येथील नवनीत हिंमत पाटील (वय ४०) असे वीर जवानाचे नाव आहे. गेल्या २२ वर्षापासून ते आर्मीमध्ये सेवा बजावत होते. सध्या भोपाल येथील कॅम्पमध्ये ते हवालदार म्हणून १०५ रेजिमेंटच्या बटालियनमध्ये सेवा बजावत होते. दरम्यान, २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता भोपाळ येथील कॅम्पमध्ये बोरिंगची मोटर काढण्याचे काम सुरू होते. या वेळी अचानक मोटर काढण्याचा हुक सटकल्याने तो हुक त्यांच्या डोक्याला लागून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले असा परिवार आहे. दरम्यान, २९ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास करमाड या मूळ गावी त्यांची अंत्ययात्रा निघणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.