जळगाव मिरर । ३१ जानेवारी २०२३ ।
राज्यातील अनेक तरुण पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नेहमीप्रमाणे सकाळी धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणासाठी सकाळ मात्र काळ बनून आली. रस्त्यावरून धावत असताना वाहनाच्या धडकेत कजगावच्या रोहित मराठे या तरुणाचा मृत्यू झाला.
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील १८ वर्षीय तरूण रोहित अशोक मराठे हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत भडगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जात असताना चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रोहितला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रोहितच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत अपघाताला कारणीभूत असलेले वाहन घेऊन चालक फरार झाला.
यावेळी मित्र वैभव बोरसे, हर्षल पाटील, दत्तू महाजन यांच्यासह दादाभाऊ पाटील, रवी मालचे, अशोक पाटील मदतीला धावले. उपचारासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन लावून उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची वार्ता कजगावात समजतात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेला रोहीत मराठे यांच्या मागे वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
रोहित हा भडगाव येथील न्यू इंग्लिश माध्यमिक शाळेत बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्याला पोलिस विभागाचे आकर्षण होते. त्यासाठी तो मित्रांसोबत सकाळी मॉर्निंग वॉक करणे, सायंकाळी भरतीसाठी सराव करीत होता. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नित्याने व्यायामाचा सराव सुरू होता. मात्र नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावणाऱ्या रोहितची सकाळ जणू काळ ठरली. ही घटना संपूर्ण गावातील नागरिक व रोहीतच्या मित्रांना धक्का देणारी आहे.