जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२४
महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शुक्रवारी महामार्गावरील इच्छा देवी चौक, आकाशवाणी चौक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालयाजवळील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारकांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून यापुढे पुन्हा येथे अतिक्रमण करू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा व्यावसायिकांना देण्यात आला आहे. मात्र जळगाव शहरातील मुख्य रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणावर मनपा कारवाई करणार का ? याकडे देखील जनतेचे लक्ष लागून आहे.
शहरातील कालिंका माता चौफुलीवर बुधवारी रात्री भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे ९ वर्षिय बालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला होता. तसेच अग्निशमनचे वाहन रोखून ठिय्या आंदोलन केले होते. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला होता. यावेळी अतिक्रमणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आल्याने मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी महामार्गावरील सर्व सिंग्नलच्या आजूबाजूचे अतिक्रमण काढण्याचे आदेश मनपा अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार मनपाच्या पथकाकडून गुरुवारी अजिंठा चौक व कालिंका माता चौफुलीवरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर व पथकाने इच्छा देवी चौक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या समोरील, आकाशवाणी चौकाच्या आजूबाजूला असलेल्या हातगाड्या जप्त केल्या असून पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण करण्यात येवू नये, असे निर्देश व्यावसायिकांना देण्यात आले आहेत. शनिवारी देखील प्रमुख चौक व मार्गावरील अतिक्रमण काढले जाणार असल्याचे सजंय ठाकूर यांनी सांगितले.
टॉवर चौक ते नेहरू चौक देत आहे अपघाताला आमंत्रण !
जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले टॉवर चौक ते नेहरू चौक या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक छोट्या मोठ्या दुकानधारक व हातगाडीने मोठे अतिक्रमण करून ठेवले आहे. मनपा आयुक्त हे नेहमीच या रस्त्याने ये – जा करीत असतात या अतिक्रमणावर आयुक्त का कारवाई करीत नाही, या ठिकाणी देखील अपघात होवून कुणाचा जीव जाण्याची वेळ आयुक्त बघत आहे का ? असा प्रश्न देखील नागरिकांमध्ये उपस्थित होते आहे.