जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरी, घरफोडी व दरोड्याच्या घटना सातत्याने घडत असतांना आता चोपडा शहरात देखील दरोड्याच्या तयारीत असेलली टोळी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या टोळीत तब्बल सात जणांचा समावेश असून अन्य तीन फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहर पो.नि.के.के.पाटील हे मॉर्निंग वॉकला जात असता चोपडा पोलिस स्टेशनला निनावी फोनद्वारे माहिती मिळाली की, तापी सूतगिरणी परिसरात काही अज्ञात चोरटे दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. या आधारे पाटील यांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. या पथकाने दरोड्याच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातील सात जणांना पकडले आहे. तर तिघे फरार आहेत. यात दादला सीराम नरगावे (२०), सियाराम बेलोरसिंग चव्हाण (२३), जगदीश दमडीया नरगावे (२४), ईकेश रामलाल सोलंकी (१९), अर्जुन बळीराम आर्य (१९, सर्व सेंधवा, जि. बडवाणी) या पाच जणांसह दोन अल्पवयीन मुलांसह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांच्या ताब्यात असलेले लोखंडी रॉड, लोखंडी गज, मिरची पूड, लोखंडी पक्कड, दोन लोखंडी पाने, एक चाकू, धारदार लोखंडी करवत यासह जनरेटर मशीन, पिकअप वाहन ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर चोपडा शहर पोलिस स्टेशन ठाण्यात भादंवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक घनशाम तांबे हे करीत आहेत. पाच सज्ञान, दोन अल्पवयीन असे एकूण सात आरोपी अटकेत असून इतर तीन फरार आहेत.