जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२४
राज्यातील गेल्या काही महिन्यापासून उच्चशिक्षित तरुण तरुणी आत्महत्या करीत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना आता नुकतेच राज्यातील अकोला शहरातील एका विद्यार्थीनीने दिल्लीमध्ये युपीएससीची तयारी करीत असतांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंजली असे या तरुणीचे नाव असून तिने सुसाईड नोटही लिहिली आहे. परीक्षा आणि खर्चाला कंटाळून आयुष्य संपवल्याचे चिठ्ठीतील माहितीवरुन समोर आले आहे. तसेच अंजलीच्या सुसाईड नोटमध्ये पेइंग गेस्ट सुविधा आणि हॉस्टेलच्या महागड्या खर्चाचाही उल्लेख आहे. 26 वर्षीय अंजली गोपनारायणने जुन्या राजिंदर नगरमधील तिच्या भाड्याच्या खोलीत आत्महत्या केली.
सविस्तर वृत्त असे कि, अंजली राजधानी दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमध्ये युपीएससी परीक्षेची तयारी करत होती. शनिवारी अंजलीने हॉस्टेलच्या आपल्या खोलीमध्ये गळफास घेत आयुष्य संपवले. ‘सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा’ आणि ‘रोजगार निर्माण’ करण्याचे आवाहन सुसाईड नोटमध्ये तिने सरकारला केले. ती वाढलेल्या रुम भाड्यामुळेही तणावात होती असे सांगण्यात येत आहे.
आई-बाबा मला माफ करा. मी आता आयुष्याला कंटाळले आहे. माझ्यासमोर फक्त समस्या आणि समस्याच आहेत. मला आता शांततेची गरज आहे. या नैराशातून मुक्त होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यावर मात करू शकले नाही, असे अंजलीने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास व्हावी असे माझे स्वप्न होते. पण मी किती चंचल आहे ते सर्वांना माहित आहे. कृपया सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा आणि रोजगार निर्माण करा. नोकरीसाठी अनेक तरुण धडपडत आहेत, असे तिने म्हंटले आहे.
दरम्यान, अंजलीच्या आईने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, आम्ही अंजलीच्या शिक्षणावर केलेल्या खर्चामुळे ती चिंतेत होती. आम्ही तिला अनेकदा याबाबत समजावले. तरीही तिने कोणताही विचार न करता असे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.