अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील पिंपळे रस्त्यावर असलेल्या लॉन्ड्रीचालकाने कपड्यांमध्ये सापडलेले २४ हजार ५०० रुपये परत केल्यामुळे कॉलनीतील नागरिकांनी लॉन्ड्रीचालकाचा सत्कार केला.
पिंपळे रस्त्यावर विवेकानंद नगरजवळ अनिल वाघ यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. जवळच्या कॉलनीतील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक एन. एन. पाटील (गांधलीकर) यांचे कपडे अनिल वाघ यांच्याकडे इस्त्री करण्यासाठी दिले होते. एकदा त्यांच्या कपड्यांच्या खिशात १६ हजार रुपये निघाले. तसेच २९ एप्रिल रोजी पुन्हा एकदा ८ हजार ५०० रुपये खिशात सापडले. दोन्हीवेळेस अनिल वाघ यांनी एन. एन पाटील यांच्या घरी जाऊन ते परत केले. या मोबदल्यात दिलेले बक्षीसही स्वीकारले नाही. २४ हजार ५०० एवढी रक्कम मिळाली असतानादेखील अनिलला मोह झाला नाही.
प्रामाणिकपणाचा सत्कार
प्रामाणिकपणाचे फळ नक्कीच मिळते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध होते. लॉन्ड्रीचालक अनिल वाघ यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा कॉलनीतील नागरिकांच्या लक्षात आल्याने एन. एन. पाटील यांच्या घरी वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ए. डी. भदाणे, यज्ञेश्वर पाटील, अशोक पाटील, बळवंत पाटील, विलास बोरकर, दिलीप पाटील तसेच कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.