जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्या पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला आहे. कौटूंबिक वादातून पतीने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात घडली आहे. यामध्ये रेखाबाई दुरसिंग बारेला (वय ४४) या महिलेचा खून झाला असून संशयित पती दुरसिंग बारेला (४७) याला चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील धनवाडी येथील योगीराज पाटील यांच्या शेतात दुरसिंग बारेला व पत्नी रेखाबाई बारेला यांच्यामध्ये सोमवारी रात्री उशिरा कुठल्यातरी वादातून जोरदार भांडण झाले त्यानंतर पतीने संतापाच्या भरात पत्नीवर धारदार शस्त्राने वार करीत खून केला.
या हत्येनंतर संशयित पसार झाला होता तर मुले आईच्या मृतदेहाजवळ बसून होती. मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांनी धाव घेतली. चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, गणेश सोनवणे यांनी २४ तासात खुनाची उकल करीत आरोपीला अटक केली. याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.