जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२३
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष व प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची बैठक गुरुवारी (दि.२४) शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात पार पडली.
बैठकीच्या सुरुवातीला मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा शाखेकडून अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाखा विस्तार व पुढील वर्षभरात करावयाच्या कार्यक्रमांचे नियोजन याबाबत प्रशांत दामले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडून घेण्यात येणाऱ्या एकांकिका स्पर्धांची प्राथमिक फेरी जळगाव येथे घेण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे, उपाध्यक्ष ॲड.संजय राणे, कोषाध्यक्ष डॉ.शमा सराफ, मुख्य कार्यवाह ॲड.पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल व शरद भालेराव, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री शरद पांडे, चिंतामण पाटील, गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.