जळगाव मिरर | २६ जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी आपला अजेंडा समोर ठेवला असून नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेत बसण्याचा नारा दिल्याने राज्याच्या राजकारणातील सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. यावर आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता राज ठाकरेंवर देखील टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, राज्यात दिखावा करणारे अनेक जण आहेत. ते काही जण बोलतात एक आणि करतात असा हल्लाबोल त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच काही पक्ष हे नेहमी महाराष्ट्र विरोधी पक्ष घेण्यासाठी निर्माण झाले आहेत असेही ते म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी विधानसभेत स्वबळावर 250 जागा लढवण्याची घोषणा केली. यावरून राऊतांनी बोचरी टीका केली आहे. प्रसार माध्यमांशी राऊत बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले, ”राज ठाकरे हे नुकतेच परदेशातून आले आहेत. राज्यात नेमके काय सुरू हे त्यांना समजायला वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे शत्रू असलेल्या मोदी, शहा यांना बिनशर्ट पाठिंबा दिला. जणू काय महाराष्ट्रावर उपकार करण्यासाठीच मोदी, शहांचा जन्म झाला. मात्र लोकसभा झाल्यावर एका महिन्यातच राज ठाकरेंची भूमिका बदलली. मनसे 250 जागा लढणार हे आश्चर्यकारक आहे. विधानसभेत अपशकुन करण्यासाठी स्वाभिमानी पक्षांना ही पावले उचलावी लागत आहेत का?. काही पक्ष नेहमी महाराष्ट्र विरोधी पक्ष घेण्यासाठी निर्माण झाले आहेत”, असे राऊत म्हणाले.