जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२४
येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे हे १०वे वर्ष आहे. सदर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी श्री.मोहनजी देसले साहेब (विभागीय सचिव, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,नाशिक) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
श्री.मोहन देसले साहेबांना संस्थेच्या वतीने मानपत्र, शाल,श्रीफळ प्रदान करून यथोचित सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती देवकर मॅडम यांना देखील सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.केतन नारखेडे (विभागप्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र मू.जे.स्वायत्त महाविद्यालय), श्रीमती एम. यु. देवकर मॅडम (सहसचिव नाशिक विभागीय मंडळ), बोर्डातील अधिकारी श्री. रमेश गोसावी, श्री.संजय बोरसे, उपप्राचार्य श्रीमती करुणा सपकाळे, प्रा. आर.बी.ठाकरे (पर्यवेक्षक), स्पर्धेचे परीक्षक प्रा.गणपत धुमाळे, प्रा.अमोल देशमुख, प्रा.स्वाती बऱ्हाटे (विज्ञान शाखा समन्वयक), प्रा.उमेश पाटील (कला व वाणिज्य शाखा समन्वयक) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.ईशा वडोदकर, प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना श्री.देसले साहेबांनी नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील बहुआयामी, बहुश्रुत असणे, तसेच आपल्या विषयासह इतर विषयांशी योग्य समवाय साधत विषयाचे ज्ञान अद्ययावत करून अध्यापन रंजक पद्धतीने करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी घोकंपट्टीपेक्षा निरिक्षणातून अभ्यास केल्यास अधिक गुण संपादित करता येतील असे प्रतिपादन केले.ते पुढे असेही म्हटले की, तीन ते सहा वयोगटाच्या शिक्षणावर नवीन शैक्षणिक धोरणात अधिक भर देण्यात आला आहे. ज्ञान समजून घ्या. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजेपर्यंत थांबू नका.
सदर स्पर्धेत एकूण ३०स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी सहभागी स्पर्धक,संघ व्यवस्थापक, प्राध्यापक बंधू -भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा समिती सदस्यांसह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.