जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२४
राज्यातील बदलापूर, अकोला याठिकाणच्या घटना ताज्या असतांना नुकतेच कोल्हापुरात अवघ्या 10 वर्षीय मुलीची अत्याचारानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. मृत मुलगी बुधवारपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह आज गुरुवारी गावालगतच्या शेतात आढळला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा राज्य हादरले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या शिये गावातील रामनगर परिसरात ही घटना घडली आहे. पीडित 10 वर्षीय मुलगी बुधवार दुपारपासून (21 ऑगस्ट) बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पण रात्री उशिरापर्यंत ती सापडली नाही. अखेर आज सकाळी (22 ऑगस्ट) गावालगतच्या एका शेतात तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्यानुसार पोलिस आपल्या तपासाची चक्रे फिरवत आहेत. तूर्त मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पोलिसांना या घटनेचा वेगवान तपास करण्याचे निर्देश दिलेत. पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, शिरोली एमआयडीसी हद्दीतील रामनगर येथे 3 वर्षांपूर्वी बिहारमधून स्थलांतरित झालेल्या गुड्डू सिंह अग्रहारी यांचे कुटुंब राहते. गुड्डू सिंह व त्यांची पत्नी एमआयडीसीतील एका कंपनीत काम करता. बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास हे दोघेही कामासाठी घराबाहेर पडले. त्यांना 3 मुली व 2 मुले आहेत. सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना आपली मुलगी दिसली नाही. त्यांनी तिचा शोध घेतला. पण तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनसार पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिये रामनगर परिसरातील विहिरी, ओढे, ऊसाच्या शेतात तपास केला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही खंगाळले. पण कोणताही सुगावा लागला नाही. त्यानंतर आज सकाळी रामनगर येथील एका ऊसाच्या शेतात सदर मुलीचा मृतदेह आढळला. सदर मुलीच्या अंगावर ड्रेस होता. पण चप्पल व तिची अंतर्वस्त्र बाजूला पडली होती. त्यामुळे तिची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली असण्याचा अंदाज आहे.