जळगाव मिरर । २२ जानेवारी २०२३ ।
शेतकऱ्यांकडून समृद्धी सोलर या नावाच्या बनावट खात्यामध्ये ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून घेऊन – शेतकऱ्याची ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ६८ हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दाखल या गुन्ह्यात आरोपीने बनावट कागदपत्रे देऊन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चाकण येथे समृद्ध सोलर या नावाने बनावट खाते उघडले होते. आरोपीचा गुन्ह्यात कोणत्याही प्रकारे मागमूस नसताना ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे बनावट खाते उघडणारा आरोपी निष्पन्न केला. त्याचे अविनाश सुभाष सावंत, ( २६, उपळी, ता. वडवणी, जि. बीड) असे मिळून आले. आरोपीचा पोलिसांनी खूप कसोशीने शोध घेतला; परंतु आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवून पळत फिरत होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीची माहिती काढून आरोपी हा चाकण, पुणे येथे असल्याचे समजले. लागलीच तेथे तपास पथक पाठवून चाकण येथून आरोपीस ताब्यात घेतले.
तपासात आरोपीने लोकांच्या फसवणुकीच्या रकमेतून त्याचे नातेवाईक व मित्रांच्या नावे १ लाख ५० हजार रुपयांची एक चारचाकी गाडी व १८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट खरेदी केले असून ते जप्त करण्यात आले आहेत.