जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२५
अमळनेर नदीवर पुजा विधीसाठी पेटविलेल्या होम,धुनीमुळे धूर झाल्याने पुलाखाली असलेल्या मधाच्या पोळ्यावरील मधमाशा आक्रमक झाल्या. त्यांनी थेट तेथे असलेल्या नागरीकांवर हल्ला चढविला हल्ल्यात एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ५ रोजी दुपारी साडे बारा वाजता जळोद येथे नदी काठावर घडली. अमोल शुक्ल (वय ३८) रा. पाठक गल्ली असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील जळोद येथे नुकतेच निधन झालेल्या डॉ. काकासाहेब देशमुख यांच्या अकराव्याची पूजा होती. या पूजेच्या विधिकार्यासाठी पुजारी अमोल शुक्ल पुजेसाठी उपस्थित होते. जळोद येथे नदी काठावर पुलाखाली स्व. देशमुख यांच्या मुली व मुलांसोबत पूजा सुरू होती. पूजेत होम पेटवला असता धूर झाल्याने पुलाखाली असलेल्या मधमाशांच्या पोळ्यापर्यंत धूर पोहोचल्याने मधमाशांनी पूजेला बसलेल्यांवर हल्ला करत दंश करण्यास सुरूवात केली. यामुळे तेथे उपस्थित सर्व जण सैरावैरा पळू लागले. त्याचवेळी पुजारी अमोल शुक्ल हे,पळू नका खाली झोपून घ्या. त्या चावणार नाहीत. असे आवाहन करत होते. तर आपण पळालो तर त्या आपल्याला चावतील असे म्हणत ते खाली वाकले. त्यामुळे सर्वात जास्त मधमाशा त्यांनाच चेहऱ्याला चावल्या. आधीच त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे जास्त त्रास होऊ लागला म्हणून उपचारासाठी त्यांना अमळनेर येथे आणत असताना रस्त्यात श्वास बंद पडून त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान इतर पाच ते सहा जणांना देखील मधमाशा चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. त्यांना अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार करण्यात आले. मात्र, पुजारी अमोल शुक्ल हे या मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.