जळगाव मिरर | ६ मार्च २०२४
पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात मर्जीप्रमाणे शपथपत्र लिहून द्यावे. यासाठी अॅड. पियूष नरेंद्र पाटील (रा. दीक्षितवाडी) यांचे त्यांच्या काकांसह अन्य जणांनी अपहरण केले. तसेच त्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत त्यांच्याकडील आठ ते नऊ हजार रुपये काढून घेतले. ही घटना दि. २८ डिसेंबर २०२३ ते दि. २९ डिसेंबर २०२३ दरम्यान दीक्षितवाडी परिसरात घडली. या प्रकरणी सोमवार दि. ४ मार्च रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन काकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षापुर्वी मालमत्तेच्या वादातून अॅड. पियूष पाटील यांनी पोलिस ठाण्यात काकांविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात त्याच्या काकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याविषयी आम्ही सांगू त्या प्रमाणे शपथपत्र दे या मागणीसाठी त्यांचे काका संजय भास्कर पाटील, विजय भास्कर पाटील यांच्यासह सुहास वसंत चौधरी, नरेंद्र गुलाब गांगुर्डे आणि शैलेजा नरेंद्र गांगुर्डे या पाच जणांनी अॅड. पियुष पाटील यांचे अपहरण केले. त्यांचे हातपाय बांधून बंदुकीचा दाखविला व कमरेच्या पट्ठयांनी बेदम मारहाण करून त्यांच्या पँटच्या खिशातून आठ ते नऊ हजार रुपये काढून घेतले. तसेच तू आमच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात आम्ही सांगतो तसे शपथपत्र दे नाहीतर तुला जिवेठार मारू अशी धमकी दिली होती.
या प्रकरणी अॅड. पियूष पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दि. ४ मार्च रोजी संजय पाटील, विजय पाटील, सुहास चौधरी, नरेंद्र गांगुर्डे, शैलेजा गांगुर्डे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मीरा देशमुख करीत आहेत.