जळगाव मिरर / २६ एप्रिल २०२३ ।
मुंबईतील नातेवाईकाकडे ईद साजरी करण्यासाठी गेलेल्या अय्युब दिलावर खान यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या अंगठ्यांसह टीव्ही व रोकड असा एकूण ५० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, अय्युब दिलावर खान हे पत्नीसह रविवारी मुंबई येथे नातेवाईकांकडे ईद साजरी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे गेंदालाल मिल येथील घर कुलूप बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केली. चोरीची घटना मंगळवारी सकाळी त्यांची गेंदालाल मिल येथे राहणारी मुलगी तंजिला हिच्या लक्षात आल्यानंतर तिने लागलीच भाऊ अल्तमश खान याला फोन करून माहिती दिली. नंतर दोघांनी वडिलांचे घर गाठल्यावर त्यांना हॉलमधील टीव्ही चोरीला गेलेला दिसला. कपाटातील ३५ हजार रुपयांची रोकड आणि ८ हजार रुपये किंमतीच्या लहान ४ सोन्याच्या अंगठ्या चोरीला गेलेले दिसले. अल्तमश खान याने लागलीच शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.