जळगाव मिरर | २६ जुलै २०२४
राज्यातील खान्देशामधील नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु झाला असून नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. नवापूर रंगावली नदीला पूर आल्याने नवापूरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नवापूर शहरातील जीवनदायीनी समजली जाणारी रंगावली नदी दोन्ही काठासह दुथडी भरून वाहत आहे. मात्र नवापूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे. तर शहरी भागातील सकल भागातील घरात पाणी शिरले आहे.
नावापुरमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने पावसाच्या संततधार सुरू आहेत. नवापूर शहरातील इंदिरानगर, बजरंग चौक, डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, प्रभाकर कॉलनी, इस्लामपुरा, देवळफळी, आदी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. लोकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. सकल भागातील घरात पाणी शिरल्याने अनेकांनी रात्र जागून काढली. शहरात वीस पुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यावर झाड उलमडून पडली आहेत.
तर सकाळी काही काळ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. दरम्यान, नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा अनेक ठिकाणी पावसामुळे संपर्क तुटला आहे. याशिवाय पश्चिम रेल्वे विभागाचा नागपूर सुरत रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्णांचेही हाल झाले आहेत.