
जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२४
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशातील अनेक भाविक भक्त देवदर्शनाला जावून लीन होत असतात. देशभरातून २.५० लाखांहून अधिक भाविक साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाविकांच्या संख्येत ५० हजारांची वाढ झाली आहे. साई मंदिर ३१ डिसेंबर रोजी रात्रभर भाविकांसाठी खुले राहणार असल्याचे संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. साई प्रसादालयातील मेनू : वरण, भात, पोळी, शिरा, दही, २ भाज्या असा मेनू आहे. त्यासाठी एका दिवशी २ लाख पोळ्या, भाजीपाला १५ क्विं. , ४० क्वि. तांदूळ, तर ३५ क्विं. गहू लागणार आहेत.
प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी १ जानेवारी रोजी ५.५० लाख भाविक येण्याची शक्यता अाहे. गेल्या वर्षी सुमारे ५ लाख भाविकांनी भेट दिली होती. भाविकांची उदंड गर्दी लक्षात घेऊन यंदा १ जानेवारी रोजी पहाटे ३.१५ वाजता दर्शनाला सुरुवात होणार अाहे, अशी माहिती सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या कार्यकारी वीणा पाटील यांनी दिली. १ जानेवारीला श्रींच्या दर्शनाच्या वेळा पहाटे ३.१५ ते ५.१५ वा. पर्यंत, सकाळी ६.०० ते दुपारी ११.५० वा. पर्यंत, दुपारी १२.३० ते सायं ६,५० वा. पर्यंत आणि रात्री ८.०० ते १०.३० वा. पर्यंत राहील, असे मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी सांगितले. व्हीव्हीअायपी, व्हीआयपी, महिला, पुरुष व त्यांच्या कुटुंबासह येणाऱ्या भाविकांसाठीही विशेष व्यवस्था केली आहे.
त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे ४० हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली. देणगी दर्शनासाठी चार तास तर पूर्व दरवाजातून रांगेतून दर्शनासाठी सात तास लागत होते. रविवारप्रमाणेच देणगी दर्शन व पूर्व दरवाजातून दर्शनासाठीची रांगही दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत होती. दर्शनासाठी वेळ लागत असल्याचे पाहून अनेक भाविकांनी कळसाचे दर्शन घेत माघारी जाणे पसंत केले, तर अनेकांनी पालखीचे दर्शन घेतले.