
जळगाव मिरर | ९ नोव्हेबर २०२३
राज्यातील नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुली कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेले असतांना त्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर तांडा या परिसरात दि.८ नोव्हेबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेत पूजा अशोक जाधव (वय १६ वर्ष) खुशी देवा भालेकर (वय १६ वर्ष) अशा दोन अल्पवयीन मृत मुलींची नावे आहे. हि घटना परिसरात समजताच एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर तांडा येथील तीन अल्पवयीन मुली बुधवारी दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी केटी बंधाऱ्याजवळ गेल्या होत्या. कपडे धूत असताना यातील एका मुलीचा पाय घसरल्याने ती बंधाऱ्यातील पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दोन मुलींनी पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने तिघीही पाण्यात बुडाल्या. आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुलींना वाचवण्यासाठी काहींनी पाण्यात उड्या घेतल्या.
मात्र, यातील कावेरी भालेकर या मुलीला गावकऱ्यांनी वाचवले. मात्र, पूजा जाधव आणि खुशी भालेकर खोल पाण्यात बुडाल्याने बेशुद्ध झाल्या. दरम्यान, नागरिकांनी त्यांना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या मुलींवर काळाने घाला घातल्याने चिंचविहीर तांडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद नांदगाव पोलिसात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय वाघमारे करीत आहेत.