जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२५
शहरातील अनेक परिसरात छोट्या मोठ्या कारणाने हाणामारीच्या घटना नेहमीच्या झाल्या असतांना आता एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सम्राट कॉलनी परिसरात दुचाकीवर जात असताना धीरज दत्ता हिरवाडे (वय २५, रा. सम्राट कॉलनी) यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून अडवून चाकूने वार करण्यात आला. यावेळी त्यांची बहीण नेहा हिरवाडे ही भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलादेखील वीट मारली. ही घटना १३ एप्रिल रोजी न्यू सम्राट कॉलनीमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यू सम्राट कॉलनी परिसरातून जात असताना धीरज हिरवाडे यांना तीन जणांनी अडविले. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करीत एकाने डोक्यावर चाकू मारला. तेथे हिरवाडे यांची बहीण भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलादेखील वीट मारून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी धीरज यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका ईश्वर लोखंडे करीत आहेत.