
जळगाव मिरर | २० मार्च २०२५
पहाटेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून एकाच दुचाकीवरुन आलेल्या तिघ चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप तोडले. ते कुलूप सोबत आणलेल्या पिशवीत टाकून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर कॅबीनमध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेरा उलटा करुन तेथे ड्रॉवरमध्ये ठेवलेली ५१ हजार रुपयांच्या रोकडसह चांदीचे शिक्के असा एकूण ५४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि.१९ रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास भोईटेनगरातील यश लॉन्स परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील प्रेमनगरात प्रफुल्ल वसंतलाल झंवर हे वास्तव्यास असून त्यांचे भोईटे नगरातील यश लॉन्सच्या बाजूला न्यू, नितीन एजन्सीज नावाने किराणा सामान डिस्ट्रीब्युटचे दुकान आहे. दि. १८ रोजी दिवसभर दुकानात व्यापार केला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास व्यापाराची ५० हजार रुपयांची रोकड गल्ल्यात ठेवून दुकानाला कुलपू लावून झंवर हे घरी गेले. बुधवार दि. १९ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ साडे वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले. यावेळी त्यांना दुकानाचे कुलूप तोडून शटर अर्धवट उघडे दिसले. त्यांनी लागलीच दुकानात जावून पाहणी केली असता, गल्ल्याचे ड्रावर हे काऊंटवर ठेवलेले दिसले आणि त्यामध्ये ठेवलेली ५० हजारांची रोकड दिसून आली नाही.
तसेच काऊंटरमध्ये ठेवलेल्या दुकानातील कलेक्शनच्या तीन बॅगा आणि पावती पुस्तक आणि बिले देखील मिळून आले नाही. त्यामुळे झंवर यांना दुकानात चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मोबाईल फॉरेन्सीकचे पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.
पोलिसांसह झंवर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परिसरात शोध घेतला असता, त्यांना शाहूनगरजवळी पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या रेल्वेच्या एका खोलीमध्ये चोरट्यांनी दुकानातून चोरलेली बॅग आणि तेलाचे पाऊचा खोका मिळून आला. चोरीची संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ते फुटेज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या फुटेजवरुन पोलिसाचा तपास केला जात आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.