जळगाव मिरर | ६ मार्च २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर कृत्य सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळताच कारवाई सुरु असतांना नुकतेच एक धक्कादायक घटना घडली आहे. गांजाची विक्री करण्यासाठी स्कुल बॅगमधून गांजाची वाहतुक करणाऱ्या विनोद भिमराव शिंदे (वय ४९, रा. वर्डी ता. चोपडा) याच्या शनिपेठ पोलिसांनी सोमवारी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून तीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विनोद शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चोपडा तालुक्यातील वर्डी येथील विनोद शिंदे हा कोणाला संशय येवू नये म्हणून स्कुल बॅगमधून गांजाची वाहतुक करीत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. संशयित हा शहरातील मायक्का देवी मंदिर परिसरात असल्याचे कळताच गुन्हे शाखेच्या पथकाने संशयास्पदरित्या फिरत असलेल्या विनोद शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या स्कुल बॅगेतून २४ हजार ९६८ रुपये किंमतीचा सुमारे ३ किलो १२१ ग्रॅम गांजा मिळून आला. पथकाने तो गांजा जप्त केला असून त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर या करीत आहेत.
या पथकाची कारवाई
ही कारवाई शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोकॉ राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे, शशिकांत पाटील यांच्या पथकाने केली.