
जळगाव मिरर | २६ मे २०२५
राज्यातील पुणे शहरातील गुन्हेगारी मोठ्या पद्धतीने होत असतांना आता शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे दोन लहान मुले तसेच महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या धक्कादायक घटनेने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती येथील खंडाळा माथाजवळ पुणे-अहिल्यानगर महामार्गाजवळ रविवारी (दि.25) दुपारी महिलेचा व दोन लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती कळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यातील महिलेचे वय वीस ते पंचवीस वर्षे, मुलाचे साडेतीन ते चार वर्षे, मुलीचे वय एक ते दीड वर्ष आहे.
पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पथकासह सदर ठिकाणी जात या घटनेचा पंचनामा केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक वाघमोडे, सीमा काळे, खंडाळ्याच्या पोलिस पाटील सीमा खेडकर, रांजणगावच्या पोलिस पाटील सारिका पाचुंदकर या वेळी उपस्थित होते. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी घटनास्थळी भेट दिली. रांजणगाव एमआयडीसी पोलिस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या.
या वेळी अपर पोलिस अधीक्षक बापूराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यासह रांजणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह पोलिसांचे तपास पथक उपस्थित होते. या वेळी श्वान पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसराची पाहणी केली. दरम्यान, यातील महिलेच्या उजव्या हातावर ’जय भीम’ असे गोंदण्यात आलेले आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास रांजणगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.