
जळगाव मिरर / २१ एप्रिल २०२३ ।

शहरात महामार्गासह अनेक छोट्यामोठ्या रस्त्यावर दुचाकी अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. गेल्या काही दिवसापासून शहरातील प्रमुख रस्त्यावर डागडुजीचे काम सुरु असतांना याचा नाहक त्रास वाहनधारकांना होत आहे. त्यामुळे देखील अपघात होण्याची संख्या वाढू लागली आहे. शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी हमीद शेख मोहम्मद शफी (वय-३८) हे १९ एप्रिल रोजी त्याच्या दुचाकीने नुतन मराठा महाविद्यालयाजवळून जात असतांना समोरून अज्ञात दुचाकीधारकाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात हमीद शेख हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. या अपघात प्रकरणी गुरूवार २० एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार संगिता खांडारे पुढील तपास करीत आहे.




















