जळगाव मिरर | २१ जून २०२४
राज्यातील बारामती मतदार संघ नुकताच लोकसभेच्या माध्यमातून चर्चेत आला होता पण आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच हा मतदार संघ चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये दादा बदलणार अशा चर्चा जोरदार सुरु झाल्या असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे आता बारामतीचे नवीन दादा होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण यापूर्वी बारामतीमध्ये वाद तोच दादा नवा अशा आशयाचे बॅनर्स झळकले होते. त्यातच युगेंद्र पवार यांचे भावी आमदार म्हणून बॅनर्स झळकले होते. मात्र आता खुद्द युगेंद्र पवार यांनी विधानसभेच्या उमेदवारीवरून सूचक विधान केले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलतांना युगेंद्र पवार यांना भावी आमदार म्हणून झळकलेल्या बॅनर्सबाबत विचारण्यात आले असता त्यांनी एक संकेत देणारे विधान केले आहे. ते म्हणाले, ”मला संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ते मला सांगून असे काही करत नाहीत. त्यांनाही थांबा असंही बोलता येत नाही. त्यांच्यात उत्साह असतो. त्यांनाही काही काही करायचे असते. आता मी साहेबांबरोबर खूप फिरत आहे. शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत, जयंत पाटील, सुप्रिया सुळेंशी बोलून चर्चा करून पुढे बघू”, असे सूचक विधान युगेंद्र पवार यांनी केले आहे.