राज्यात विधानसभा निवडणूक व दिवाळीच्या सणासुदीचे फटाके फुटू लागले आहे. यंदा जनतेसाठी दिवाळी व निवडणूक सोबत आल्याने डबल दिवाळी साजरी होत आहे. मात्र पाच वर्षात एकदा दिवाळी साजरे करणारे अनेक कुटुंब जळगाव शहरात आहेत. हे परिवार नेहमीची दिवाळी उत्साहात साजरी व्हावी यासाठी जिल्ह्यातील राजकारण्यांना यंदाच्या दिवाळीतून सुबुद्धी मिळायला हवी.
दरवर्षी दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. प्रत्येक व्यक्ती आपआपल्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. मात्र यंदाची दिवाळी ‘लाडक्या’ बहिणींमुळे परिवारात जोरदार साजरी होत आहे. यंदाची दिवाळी पाच वर्षात पहिल्यांदा जोरदार साजरी करायला प्रत्येकाला मिळत आहे. जिल्ह्यातील धुरंदर राजकीय नेत्यांनी जळगाव शहरात जर उद्योगासाठी प्रयत्न करावे, तर शहरात असलेले उद्योग क्षेत्रातील कंपनीमध्ये दिली जाणारी रोजंदारी आज देखील कमी प्रमाणात आहे. त्यासाठी देखील राजकीय नेत्यांनी आपले वजन वापरून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा. मात्र यंदाच्या दिवाळी प्रमाणे प्रत्येक दिवाळी साजरी होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील राजकीय मंडळींना यंदाच्या दिवाळीत सुबुद्धी मिळाली तर आगामी काळात प्रत्येकाची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होणार हे तितकेच खरे.
योजनेंचा पडला पाऊस मात्र रोजंदारी वाढेना…
राज्यातील सरकारने गेल्या सहा महिन्यात अनेक योजनेचा पाऊस पाडला आहे, त्यामुळे या योजनेचा अनेकांनी लाभ देखील घेतला आहे. पण सरकारने उद्योग क्षेत्रात जळगाव शहरातील प्रत्येक कंपनीमधील काम करणाऱ्या ‘लाडक्या बहिणी- जावई’ यांच्या रोजंदारी वाढवली असती तर प्रत्येक परिवारात आज मोठा आनंद झाला असता मात्र सरकारने केवळ लाडक्या बहिणींच्या मतदानासाठी निव्वळ योजना आणल्या मात्र कुठेही रोजंदारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील उच्चशिक्षित तरुण निघाले परगावी !
जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेतले आहे मात्र जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या तरुणांना संधी नसल्याने अनेक तरुण आज देखील नशिक, छत्रपती संभाजी नगर, नगर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी नोकरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. मात्र आता दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पुन्हा आपआपल्या गावी परतत आहे.
बेरोजगार तरुणाचे पाऊल वळू लागले गुन्हेगारीकडे !
जळगाव जिल्ह्यात सन २०१९ पासून ते आज तागायत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी व काम मिळत नसल्याने तरुण गुन्हेगारीकडे वळू लागले आहे. अवैध धंदे करून त्यातून येणारे पैसे व त्या पैश्यातून होणारे वाद व नेहमीची गुन्हेगारी आता डोकेवर काढू लागले आहे. यासाठी जिल्ह्यातील राजकारण्यांनी चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यास आगामी काळात गुन्हेगारीमुक्त जळगाव जिल्हा होवू शकतो.