जळगाव मिरर / २२ फेब्रुवारी २०२३ ।
नेहमीच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असणारे प्रसिद्ध लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी थेट पाकिस्तानात जावून तिथल्या तिथल्या प्रेक्षकांना खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानात झालेल्या भाषणाचे व्हीडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. आमच्यावर हल्ला करणारे तुमच्या देशात मोकाट फिरतायत, असे सडेतोड वक्तव्य जावेद अख्तर यांनी लाहोरमधील एका कार्यक्रमात केले आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून पाकिस्तानच्या भूमीत जाऊन त्यांचीच शाब्दिक धुलाई करणाऱ्या अख्तर यांचे सर्वत्र कौतुक होतेय.
उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जावेद अख्तर नुकतेच लाहोरला पोहोचले होते. कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने त्यांना विचारले, तुम्ही अनेकदा पाकिस्तानात आला आहात. तुम्ही हिंदुस्थानात परताल तेव्हा तुमच्या लोकांना सांगाल की, पाकिस्तानी लोक चांगले आहेत? त्यावर अख्तर म्हणाले, आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर कसा हल्ला झाला ते आपण सर्वांनी पाहिले आहे. दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आले नव्हते. ते दहशतवादी आजही तुमच्या देशात मोकाट फिरतायत. ही तक्रार जर एका हिंदुस्थानी नागरिकाने केली तर तुम्हाला त्याचे वाईट वाटायला नको, अशा शब्दांत त्यांनी पाकडय़ांची अक्षरशः पिसे काढली. तुमच्या देशात लता मंगेशकरांचा एकही कार्यक्रम झाला नाही जावेद अख्तर यांनी कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही हिंदुस्थानात नुसरत फतेह अली खान, मेहदी हसन यांचे जाहीर कार्यक्रम आयोजित केले होते, पण तुमच्या देशात मात्र लतादीदींचा एकही कार्यक्रम झाला नाही, असे अख्तर म्हणाले.
