जळगाव मिरर | १२ जून २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु असतांना आता राज ठाकरे यांनी गुरूवारी सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसेसोबतच्या युतीसाठी सकारात्मक असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका बसला आहे. विशेषतः राज ठाकरे आपले बंधू उद्धव यांच्यासोबत युती करणार की भाजपसोबतच राहणार? असा सवालही या निमित्ताने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीसाठी राज ठाकरे प्रथम हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर अर्ध्या तासातच फडणवीस तिथे पोहोचले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांत जवळपास दीड तास प्रदिर्घ चर्चा झाली. त्यात कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे स्पष्ट झाले नाही. पण हे दोन्ही नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेत. त्यामुळे याविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या व्यस्त वेळापत्रकात ताज लँड्स हॉटेलचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांची राज यांच्यासोबत झालेली ही अनपेक्षित भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरेल का? विशेषतः ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीला ब्रेक लावून मनसे लोकसभा निवडणुकीसारखाच पुन्हा भाजपला पाठिंबा देणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे गत काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब् ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली होती. प्रथम राज ठाकरे व त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले होते. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याद्वारे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला पूर्णविराम दिल्याचे दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे यांचा सत्ताधारी महायुतीमधील भाजप व शिवसेना शिंदे गट या दोन पक्षांना कडाडून विरोध आहे. याऊलट राज ठाकरे यांचे या दोन्ही पक्षांशी चांगले संबंध आहेत. विशेषतः त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले मेतकुट जमते. हे दोन्ही नेते अनेकदा शिवतीर्थावर येऊन राज ठाकरे यांच्याशी हितगुज करतात. त्यामुळे राज व फडणवीस यांच्या आजच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा पक्ष कोणती प्रतिक्रिया देतो? यावर ठाकरे बंधूंच्या पुढच्या मनोमिलनाचे गणित अवलंबून असणार आहे.
राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोघांना मानणारा एक मोठा वर्ग मुंबई, नाशिक, ठाणे या शहरी भागांमध्ये आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्याचा मोठा परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस नेमकी हीच गोष्ट हेरून राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. ही भेट याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री निवासस्थानापासून अवघ्या 6.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ताज हॉटेलमध्ये ही भेट घेतली.
