जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये अचानक टक्कल पडण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे गावात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुरुषांसोबतच महिलांचेही केस अचानक गळू लागले आहेत, त्यामुळे नागरिकांत चर्चेला उधाण आले आहे. काही लोक या घटनेला भानामती मानत आहेत, तर काहींना वाटते की हा एक वेगळाच व्हायरस आहे.
आता या घटनेची गांभीर्याने तपासणी सुरू असून, समोर आलं आहे की या केस गळतीसाठी मुख्य कारण पाण्यातील विषारी घटक आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि खातखेड गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याचं तपासणीत उघडकीस आलं आहे. यामुळे या पाण्याचा वापर आरोग्यदृष्ट्या अत्यंत धोकादायक ठरला आहे. पाण्याची टीडीएस (Total Dissolved Solids) लेव्हलही अत्यधिक वाढलेली आहे, ज्यामुळे पाण्यामुळे होणारी आरोग्य समस्या अधिक गंभीर झाली आहे.
या प्रकारामुळे, गावातील नागरिकांमध्ये केस गळण्याचं प्रमाण झपाट्याने वाढल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी त्वरित उपाययोजना हवी असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. खारपाणपट्ट्यांतर्गत या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती, पण तरीही पाण्यातील विषारी घटकांचा प्रभाव थांबलेला नाही.
दुसऱ्या बाजूला, शेगाव तालुक्यातील टक्कल पडणाऱ्यांची संख्या सध्या 51 वर पोहोचली आहे. केवळ तीन दिवसांत टक्कल पडण्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे आरोग्य विभागाने त्वरित सर्वेक्षण सुरू केलं आहे. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, कठोरा, बोंडगाव आणि हिंगणा गावांमध्ये तपासणी सुरू केली आहे. तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी फंगल इन्फेक्शनचा शंका व्यक्त केला असून, याची मुख्य कारणं पाण्यातील विषारी घटक असू शकतात, असा अंदाज दिला आहे.