जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच कल्याण शहरात एका महिलेने आपल्या मुलीच्या मित्रांच्या मदतीने पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पती गंभीररित्या भाजला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले असून उपचार केले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६१ वर्षांच्या पतीला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये इतर दोन तरुणही आरोपी आहेत. ते पीडित पतीच्या मुलीचे मित्र असल्याचं समोर आलं आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पतीने दिलेल्या जबाबानुसार, पत्नी मासिक पेन्शनवरून सतत वाद घालायची. याशिवाय दोन तरुण सतत घरी आल्याने पती आक्षेप घेत होता. त्यावरूनही दोघांमध्ये खटके उडत होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन तरुण नेहमी घरी ये-जा करत होते. पीडित पतीने आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत याआधी दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ८ डिसेंबरच्या रात्री कोणीतरी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला आणि पत्नीने आग लावली. आग लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पतीला रुग्णालयात नेलं. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.