जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अपघाताच्या अनेक बातम्या समोर येत असतांना नुकतेच जळगाव रेल्वे स्थानकावर लोहमार्ग ओलांडताना एका महिलेला मालगाडीचा धक्का लागल्याची घटना मंगळवारी घडली होती. या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली असून दुर्दैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे फलाटावर कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबलने तत्परता दाखवत या महिलेचे प्राण वाचवले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कॉन्स्टेबलने प्रसंगावधान राखत तातडीने महिलेच्या मदतीस धावल्याने या महिलेचे जीव वाचले आहेत. या जखमी महिलेला लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास एक महिला दोन नंबर फलाटावरून तीन नंबरच्या फलाटावर येत असताना ही दुर्घटना घडली. मात्र त्याच वेळी मुंबईकडून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीला तिथे कर्तव्यावर उपस्थित कॉन्स्टेबल चांगो देवराम चौधरी यांनी पाहिले आणि तत्परतेने महिलेच्या मदतीसाठी धावले. महिलेला इंजिनचा धक्का लागला मात्र तेवढ्यात कॉन्स्टेबल चौधरी तिथे पोहोचले व फलाट आणि रेल्वेच्यामध्ये अडकलेल्या महिलेला ओढत तिला जीवदान दिले.