जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२४
जळगाव शहरातील बसस्थानक परिसरात पोलीस कर्मचारी नियुक्त करुन देखील पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरीच्या घटना सुरुच आहे. बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या हातातून ७० हजार रुपयांची सोन्याची पाटली लांबवली. ही घटना दि. १६ रोजी नवीन बस स्थाकात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातून अव्वल कारकून म्हणून निवृत्त झालेले साहेबराव चौधरी हे पत्न ी पुष्पा चौधरी यांच्यासह पारिजात कॉलनी परिसरात वास्तव्यास आहेत. दि. १६ ऑक्टोबर रोजी पुष्पा चौधरी या धुळे येथे आईकडे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या उजव्या हातातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरुन नेली. दरम्यान, बस ही खोटेनगर थांब्याजवळ पोहचली त्या वेळी हातातील पाटली गायब असल्याचे वृद्धेच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांनी बसमध्ये शोधाशोध केली, मात्र पाटली सापडली नाही. अखेर एरंडोल येथे उतरून त्या लागलीच माघारी परतल्या. जळगावात आल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी त्यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे करीत आहेत.
पुष्पा चौधरी ज्या बसमध्ये चढत असताना ही घटना घडली, ती बस धुळे जाणाऱ्या बसच्या फलाटावर लागलेली होती. पोलिसांनी चोरट्याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना या फलाटाजवळील सीसीटीव्ही बंद असल्याने व काही अस्पष्ट असल्याचे आढळून आले नवीन बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून गर्दीचा फायदा घेत चोरटे महिला प्रवशांना टार्गेट करीत आहे. त्यामुळे याठिकाणी जिल्हापेठ पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र पोलिस असून देखील त्यांच्या नाकावर टिच्चून चोरटे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवीत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे.
