जळगाव मिरर | ३० जुलै २०२४
जळगाव : जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य एसडी-सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन आणि कार्यध्यक्षा मीनाक्षीताई जैन यांच्या दूरदृष्टी आणि अमूल्य मार्गदर्शनातून अविरतपणे सुरु आहे.
विद्यार्थ्यांना जर भविष्यातील करिअर मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय निवड करून वेळेचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे या उद्देशाने एसडी-सीड तर्फे विद्यार्थ्यांसाठी “करिअर मार्गदर्शन, वेळेचे व्यवस्थापन आणि ध्येय निश्चिती आणि ती संपादन करणे” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन तीन सत्रात अभिनव माध्यमिक विद्यालय, या.दे.पाटील विद्यालय व कै जी.एन.चांद्सरकर माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून प्रा. एन.जे गादिया व प्रा. सुरेश पांडे हे होते. सुमारे २५० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.
तीन सत्रात झालेल्या कार्यशाळेत मान्यवरांनी पुढील गोष्टी रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट केल्यात.
करिअर मार्गदर्शन
करिअर निवडतांना विद्यार्थ्यांमधील बलस्थाने, कमतरता, कौशल्य आणि त्यांची आवड लक्षात घेऊन कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल याविषयी मागदर्शन करण्यात आले. करिअर निवडतांना डीटर्मिनेशन, डेडिकेशन, डिवोशन, डिसिप्लिन, डेडलाइन या ५ “D” चा अवलंब केल्यास आपण चांगले करियर निर्माण करु शकतो. करिअरचे नियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात. विद्यार्थ्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ध्येय निश्चिती
१) ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.
२) विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चित करा.
३) अक्शन प्लान तयार करा.
४) जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या त्रिसूत्रीचा वापर करा.
५) रोल मॉडेल पासून प्रेरणा घ्या.
वेळचे नियोजन
१) रोज रात्री दुसऱ्या दिवसाची कामे ठरवा. आज झालेल्या कामांचा आढावा घ्या.
२) सकाळी उठल्यावर कामांची यादी तयार करा.
३) महत्वाची कामे व कमी महत्वाची अशी विभागणी करा.
४) एखाद्या कागदावर कामाची यादी करा व त्याप्रमाणे नियोजन करा.
५) अग्रक्रम निर्धारित करून पटापट संपविण्यावर भर द्या.
६) एखादे काम करतांना त्यासाठी राखून ठेवलेल्या वेळेचा अंदाज घेऊन त्याचा वेग निर्धारित करा.
७) नाही म्हणायला शिका, कामात व्यत्यय टाळण्याचा प्रयत्न करा.
कार्यक्रमाला श्री संजय खंबायत, सौ. एस. पी.चौधरी, सौ. सरोज तिवारी व समन्वयक प्रवीण सोनवणे, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता तीनही विद्यालय व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.