जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गणेशोत्सवाचे जल्लोषात स्वागत होणार आहे मात्र पहिले २ दिवस पावसाचे असणार आहेत. कोकण, गोवा आणि विदर्भात ४ ते १० सप्टेंबर दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रातील काही भागात ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्याला ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यासाठी ७ आणि ८ सप्टेंबर दरम्यान आणि कोल्हापूरला ७ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट दिला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मान्सून ट्रफ सक्रिय आहे आणि त्याचे पश्चिम टोक त्याच्या सामान्य स्थितीच्या जवळ आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.